वॉशिग्टन : नासा च्या पर्सीवरेंस रोव्हर आणि चीनच्या झुरोंग रोव्हर यांना मंगळ ग्रहावर वाहणाऱ्या नद्या आणि ओल्या वाळूच्या ढिगाऱ्यांच्या खुणा सापडल्या आहेत. चीनच्या रोव्हरला असे आढळून आले की सुमारे ४ लाख वर्षांपूर्वी प्रचंड थंडीमुळे वाळूचे ढिगारे गोठले असतील. दुसरीकडे, नासाच्या पर्सीवरेंस रोव्हरला मिळालेल्या संकेतांवरून असे दिसून येते की शक्तिशाली जलमार्गाने जेझीरो क्रेटरमध्ये प्रवेश केला असावा, ज्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले असेल.
नासाच्या पर्सीवरेंस रोव्हरला मंगळाची आतापर्यंतची सर्वात मोठी नदी सापडली आहे. खडकांच्या आकारावरून असे अनुमान काढले जाते की ही नदी काही ठिकाणी ६६ फुटांपेक्षा जास्त खोल होती. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ती संरक्षित नदीच्या काठाची वाळू होती.
उटाहमधील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे संशोधक जानी रादेब या दोन्ही रोव्हरबद्दल माहिती देताना माध्यमांना म्हटले आहे की, दोन्ही रोव्हरने दिलेली माहिती अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे. आपल्याला दुसऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागाबद्दल माहिती सांगत आहे.
नॅट जिओच्या अहवालात चीनच्या रोव्हरला मंगळाच्या पृष्ठभागावर पाण्याचे अंश सापडले आहेत. रोव्हरजवळील वाळूच्या ढिगाऱ्यावर एक प्रकारचे कवच तयार झाले आहे, जे पाण्यातील खनिजांच्या संपर्कात येऊन तयार झाले असेल असा अंदाज आहे. हजारो वर्षांपूर्वी ग्रह झुकल्यामुळे या भागात बर्फ पडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.