लंडन : लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा १०० धावांनी दारुण पराभव केला. रीस टॉपली इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. या डावखु-या वेगवान गोलंदाजाने भारताचे कंबरड मोडले. दरम्यान या सामन्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑर्थोपेडिक असून डॉक्टर असल्याची चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर त्याच्याकडे डिग्री असल्याचेही म्हटले जात आहे.
दुस-या वनडे सामन्यात इंग्लंडच्या डावात फिल्डींग करताना रोहित शर्माचा खांदा निखळला. त्यानंतर फिजिओला मैदानावर बोलवण्याऐवजी रोहित शर्माने स्वत: खांदा रिलोकेट केला. हे पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर तो ऑर्थोपेडिक सर्जन असल्याच्या चर्चेला उधाण आले. सोशल मीडियावर एक फोटो असा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये डॉ. रोहित शर्मा असे इंटरनेटवर सर्च केल जात आहे. तर एका युजरने लोकांनी रोहितला पाहून आश्चर्यचकीत होऊ नये, कारण तो स्वत:च ऑर्थोपेडिक आहे असे म्हटले आहे. ज्यावेळी मैदानावर हा प्रसंग घडला तेव्हा भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि विवेक राजदान कॉमेंट्री करत होते. यावेळी दोघेही गमतीने म्हणाले की, रोहित शर्माला पाहून फिजिओ घाबरला असावा. कारण त्याला आपली नोकरी धोक्यात आली असे वाटले असेल.