नागपूर : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित पहिल्यांदाच कर्णधार म्हणून खेळत आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ९ वे शतक झळकावले. या शतकाने त्याच्या नावावर एक महारेकॉर्ड झाले आहे.
कर्णधार म्हणून रोहित शर्माने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांत शतके झळकावली आहेत. त्यामुळे रोहित शर्मा कर्णधार म्हणून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. या अगोदर श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांचाही क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणा-या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे.
भारतासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारख्या महान फलंदाजांनाही कर्णधार म्हणून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी २० आंतरराष्ट्रीय) शतक झळकावता आलेले नाही. ते रोहितने करून दाखविले.
रोहित शर्माने १७ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहे. यापूर्वी, रोहित शर्माने सप्टेंबर २०२१ मध्ये ओव्हलच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी शतक झळकावले होते. पहिल्या दिवशी कांगारुंना केवळ १७७ धावांत रोखून रोहितने उर्वरित २ तासांत कमालीची आक्रमक फलंदाजी केली. केवळ ६५ चेंडूत रोहितने अर्धशतक झळकावले. अर्धशतकीय खेळीमध्ये त्याने तब्बल ९ चौकार सीमारेषेपार धाडले. दुस-या दिवशीही पीच काहीसे धीमे झाल्याने रोहितचा खेळही संथ झाला. आज त्याने अतिशय संयमी खेळी करत आपले शतक पूर्ण केले. रोहितच्या शतकाने भारत कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.