चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे. अशीच एक घटना चंद्रपुरात समोर आली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका बसमधील ३५ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. स्थानिकांनी दिलेल्या इशा-याकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले असते.
चंद्रपूर येथील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात बस अडकली होती. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. पुराच्या पाण्यात बस अडकल्याची माहिती विरूर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाडसी कामगिरी करत प्रवाशांची सुटका केली. पुराच्या पाण्यात अडकलेली बस मध्य प्रदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाला स्थानिक पोलिस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितले होते.
मात्र, तरीदेखील बसचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत बस पुढे नेली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस पुराच्या पाण्यात बंद पडली. भर पुराच्या पाण्यात बस बंद पडल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होती. पुराच्या पाण्यात बसचा अर्धा भाग बुडाला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसची माहिती विरूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. विरूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पहाटेच्या अंधारात बचाव कार्य सुरू केले.