मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून पक्षचिन्ह आणि पक्षनाव मिळाल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडताहेत. काठावरच्या अनेक लोकांचा विचार बदलताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य करून गेल्या सहा महिन्यांत एकनाथ शिंदे यांना साथ देण्याची अनेकांनी भूमिका घेतली.
भायखळ्यामधूनही एक मोठी बातमी समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचे बंधू प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावून भाजपशी हातमिळवणी करून एकनाथ शिंदे यांनी नवा संसार थाटला. आठवड्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निवडणूक आयोगाने निर्णय दिला. दरम्यान उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे असले तरी दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणारांची संख्याही वाढते आहे.
मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिका-यांनी, कार्यकर्त्यांनी शनिवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शिवसेना पक्षात जाहीर स्वागत केले.