25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसाईचरणी २ कोटींचे सोने दान

साईचरणी २ कोटींचे सोने दान

एकमत ऑनलाईन

शिर्डी : फकिराचे आयुष्य जगलेल्या शिर्डीच्या साईबाबांवर जगभरातील करोडो भाविकांची अपार श्रद्धा आहे. साई दर्शनासाठी शिर्डीत आल्यावर किंवा ऑनलाइन स्वरूपात अनेकजण आपापल्या परीने साईचरणी दान करत असतात. हैदराबाद येथील एका भाविकाने साई चरणी दोन कोटींपेक्षा जास्त रुपयांचे सोने दान केले. या दानाची चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

हैदराबाद येथील पार्थ रेड्डी या साईभक्ताने ४ किलो वजनाचे तब्बल २ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे सोने साईचरणी दान दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. यानंतर रेड्डी यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
साईबाबांच्या भक्तांमध्ये दक्षिण भारतातील लोकांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापूर्वी साईभक्त के. व्ही. रमणी यांनी साईबाबा संस्थानला शंभर कोटी रुपये दान दिले होते, तर आर. रेड्डी यांनी सोन्याचे सिंहासन दान दिलेले आहे. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दान करणारे पार्थ रेड्डी हे तिसरे दक्षिण भारतीय साईभक्त ठरले आहेत.
शिर्डीचे साईमंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती पावले आहे.

देश-विदेशातून येणारे भाविक इथे सढळ हाताने मोठ्या प्रमाणात दान करतात. तिरुपती बालाजीनंतर देशात २ नंबरचे श्रीमंत देवस्थान म्हणून साईसंस्थान नावारूपाला आले आहे. साईबाबा संस्थानकडे अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी, पाचशे किलोपेक्षा जास्त सोने तर मोठ्या प्रमाणावर चांदी आहे. दान पेटीतील दानासह वस्तू स्वरूपातील दानाचा ओघ साई संस्थानला सातत्याने सुरूच असतो. लॉकडाऊनच्या संकटानंतरही दिवसेंदिवस साईबाबांच्या झोळीत दानाचा हा ओघ सुरूच आहे.

हैदराबाद येथील हेक्ट्रॉ कंपनीचे चेअरमन पार्थ रेड्डी या साई भक्ताने साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची परवानगी घेऊन साईबाबांच्या मूर्तीच्या पादुका खालील भागास नक्षीदार डिझाईन केलेले ४ किलो वजनाचे सुमारे २ कोटी रुपये किमतीचे सोने साईबाबांच्या चरणी अर्पण केले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या