नवी दिल्ली : काही आठवड्यात सुरू होणा-या राष्ट्रकुली स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन राष्ट्रकुल सुवर्णपदके जिंकणा-या सायना नेहवालचा समावेश नाही. यामुळे सायनाचा पती आणि प्रशिक्षक परूपल्ली कश्यप चांगलाच भडकला. त्याने, सायनाचा अनादर करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्याच लोकांना कशा प्रकारे वागणूक देता हे दिसून येते असे म्हणत टीका केली. परूपल्ली कश्यपने देखील २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
सायना नेहवालने सिंगापूर ओपनमध्ये चीनच्या हे बिंगजिओचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर कश्यपने सायना गेल्या काही दिवसांपासून कोणत्या मानसिकतेतून जात होती हे सांगितले. कश्यप म्हणाला की तिच्या डोळ्यात सतत अश्रू यायचे. प्रत्येक दुस-या दिवशी आमच्या संभाषणात संघातून डावलल्याचा मुद्दा यायचाच. अशा परिस्थितीत सराव करणे खूप अवघड असते. मानसिकदृष्ट्या तुम्ही द्विधा मनिस्थितीत असता की तुमचा लढा स्वत:च्याच लोकांविरूद्ध आहे की प्रतिस्पर्ध्याबरोबर. त्यामुळे तुमचे सामन्याला सामोरे जाण्याचे उद्दिष्टच चुकीच्या मार्गाला जावू शकते. ती एक भयानक मानसिक स्थिती असते.
इंडिया ओपनमध्ये मालविका बनसोडने सायनाचा पराभव केला होता. त्यानंतर सायनाला संघातील स्थान गमवावे लागले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सिंगापूर ओपनमध्ये सायनासाठी पहिल्याच फेरीतील मालविका बनसोड विरूद्धचा सामना अत्यंत महत्वाचा होता. जानेवारी महिन्यात झालेल्या त्या एका पराभवावर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया संघातील निवड ठरवणार होती. सायनाला स्वत:ला सिद्ध करायचे होते. त्यामुळे तिच्यावर दबाव होता. दुस-या सामन्यात ती तुलनेने अधिक मुक्तपणे खेळली आहे.