27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसंभाजीराजे छत्रपती ‘सागर’ बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला

संभाजीराजे छत्रपती ‘सागर’ बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील प्रमुख सत्ताकेंद्र असल्याचे दिसत आहे.

कारण गेल्या काही दिवसांमध्ये विविध राजकीय पक्षांचे बडे नेते आवर्जून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना दिसत आहेत. यामध्ये आता संभाजीराजे छत्रपती यांचाही समावेश झाला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा नेमका तपशील आणि उद्देश अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, या भेटीदरम्यान मराठा आरक्षण आणि इतर मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

२०१४ साली राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर संभाजीराजे यांची राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून वर्णी लागली होती. त्यांचा कार्यकाळ अलीकडेच संपला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंब्याची मागणी केली होती. परंतु, एकाही राजकीय पक्षाने त्यांना समर्थन दिले नव्हते.

तर शिवसेनेने संभाजीराजे यांना आपल्या पक्षाच्या तिकिटावर राज्यसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. याच निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची फाटाफूट होऊन संजय पवार यांचा पराभव झाला होता. हीच निवडणूक एकप्रकारे राज्यातील सत्तांतराची नांदी ठरली होती.

त्यामुळे आता संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, हे पाहावे लागेल. राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने संभाजीराजे यांना पाठिंबा न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस संभाजीराजे यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या