सातारा : संभाजीराजे हे छत्रपती असल्याने त्यांना स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे; पण त्यांनी भाजप सोबतच राहावे. त्याचा बहुजन मराठी समाजाला फायदा होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यास ते निवडून येणार नाहीत, त्यामुळे त्यांनी निर्णय बदलावा, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. राज ठाकरेंना आताच अयोध्या का आठवली, असा प्रश्न करून त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
सातारा शासकीय विश्रामगृहात मंत्री आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी ते म्हणाले, संभाजीराजेंना स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे; पण त्यांनी भाजपसोबत राहावे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलावा.’’राज ठाकरेंबद्दल ते म्हणाले की, मुळात महाराष्ट्रातील हिंदी भाषिक लोकांना त्यांनी विरोध करायला नको होता. त्यांना आताच अयोध्या का आठवली? त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. त्यांनी परिधान केलेले भगवे वस्त्र शांतीचे प्रतीक असून भगव्यातून वाद पेटणार नाही, याची काळजी त्यांनी घ्यावी. महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न केल्यास तो विझवू.
शिर्डीतून लोकसभा लढणार
आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून लढावी, अशी राधाकृष्ण विखे- पाटील यांची इच्छा आहे. त्यामुळे मी शिर्डीतून लढणार आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद मिळणार आहे, तसेच भाजपमधील कोणीही पंतप्रधान झाला तरी मला मंत्रिपद मिळणार आहे, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.