कोल्हापूरच्याच शिवसैनिकाला उमेदवारी?
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने ऑफर दिली होती. पण संभाजीराजेंनी सेनेची ऑफर नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याची चर्चा आहे.
शिवसेना सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीराजेंना कोल्हापुरातूनच शह देण्याचा प्रयत्न या निमित्ताने होत आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांना ही संधी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणार का, याकडे लक्ष आहे.
दरम्यान, कोणत्याही अपक्ष उमेदवाराला शिवसेना पाठिंबा करणार नाही.
दोन्ही उमेदवार शिवसेनेचाच असणार आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. राज्यसभा दोन्ही जागांसाठी पुरेस नाही तर जास्त संख्याबळ आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्या शिट्टी वाजेल. आम्ही निरोपाची वाट बघत नाही. २ जागा शिवसेना लढवणार आणि जिंकणार आहे, असेही राऊत म्हणाले.