26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeऔरंगाबादसंभाजीनगर, धाराशीव नामांतराची अधिकृत घोषणा शनिवारी : मुख्यमंत्री शिंदे

संभाजीनगर, धाराशीव नामांतराची अधिकृत घोषणा शनिवारी : मुख्यमंत्री शिंदे

एकमत ऑनलाईन

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाबाबत उद्या अधिकृत घोषणा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागचं सरकार अल्पमतात असताना त्यांनी जे निर्णय घेतले ते बेकायदेशीर आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे शिंदे सरकारचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

महाविकास सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये नामांतराबाबत घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर होते. कारण त्यावेळी सरकार अल्पमतात होतं. मग निर्णय अधिकृत कसे असणार? पण याबाबत आम्ही उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय उद्या परत घेण्यात येणार असून या निर्णयावर अधिकृत घोषणा होणार आहे असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील सभेत बोलताना शिंदे यांनी सरकारच्या स्थापनेत आलेल्या अडचणींवर भाष्य केलं आहे. आम्ही बंड केलं तेव्हा आमच्यावर कोणत्या पातळ्यावर जाऊन टीका करण्यात आली होती असा सवाल त्यांनी केला. तसेच आम्हाला हिणवण्यात आलं, आम्हाला नावं ठेवण्यात आलं पण कुणाला किती वेळ गादीवर बसवायचं हे जनता ठरवेल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं असून मी आता निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत एकाही उमेदवाराचा पराभव होणार नाही याची मी ग्वाही देतो आणि तसं झालं तर मी राजकारण सोडून देईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, ३० जून रोजी महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या क्षणाला दहा महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती. पण शिंदे सरकारने ही मंत्रिमंडळाची बैठक बेकायदेशीर असल्याचं म्हणत या निर्णयाला स्थगिती दिली होती. पण याबाबत बैठक घेऊन उद्या नामांतराच्या निर्णयावर पुन्हा अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या