27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रखा. संजय राऊत यांना अखेर अटक

खा. संजय राऊत यांना अखेर अटक

एकमत ऑनलाईन

घरी ९ आणि कार्यालयात ७ तास ईडी चौकशीनंतर रात्री उशिरा कारवाई
मुंबई : खा. संजय राऊत यांची रविवारी घरी ९ तास चौकशी केल्यानंतर ईडी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत जवळपास ७ तास चौकशी केली. त्यानंतर रात्री १ च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीने रविवारी सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

खा. संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. संजय राऊत यांच्या घरातून पत्राचाळ प्रकरणी एकही कागद ईडीला मिळाला नाही. मात्र, दिल्लीतून ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार मुंबईत दाखल होताच रात्री उशिरा राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने खा. राऊत यांच्या घरांवर धाडी टाकून झाडाझडती सुरू केली. घरी त्यांची जवळपास ९ तास चौकशी करण्यात आली.

त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि ईडी कार्यालयात आणून सायंकाळी ६ पासून ईडी कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर रात्री १ वाजेपर्यंत चौकशी केली. त्यातच दिल्लीहून उशिरा ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार मुंबईत दाखल झाले. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होणार, अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर काही वेळातच रात्री १ नंतर त्यांना अटक केली.

तत्पूर्वी, खा. राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू असताना त्यांच्या घराभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईडीच्या ७ अधिका-यांनी राऊतांच्या घरी झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या दरम्यान राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रे आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासण्यात आला. याशिवाय राऊत यांच्या दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही झाडाझडती घेण्यात आली. तेथेही काही कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी खा. राऊत यांना ताब्यात घेतले. खा. राऊत घरातून जात असताना त्यांच्या आई आणि नातेवाईक भावूक झाले. त्यानंतर ईडी कार्यालयात घेऊन जात असताना शिवसैनिक आक्रमक झाले. जमलेल्या तमाम शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून त्यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले.

कोण आला रे कोण आला-शिवसेनेचा वाघ आला… झुकेंगे नही… आव्वाज कुणाचा-शिवसेनेचा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यावेळी आमदार सुनील राऊत घराबाहेर आले. त्यांनी कार्यकत्यांना शांत राहण्याचे आवाहन करत राऊत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यात आलेली नाही, असे म्हटले. त्यानंतर ईडी कार्यालयात उशिरापर्यंत चौकशी करून अटकेची कारवाई केली.

ईडीने केलेल्या झाडाझडतीत ११.५० लाख रुपयांची रोकड खा. संजय राऊत यांच्या राहत्या जप्त केली. या रोख रक्कमेबद्दल माहिती देताना राऊत यांनी ईडी अधिका-यांना घर खर्च आणि इतर कामासाठी बँकेतून पैसे काढल्याचे सांगितले. मात्र ईडीला यांची शहानिशा आणि ही रक्कम टॅली करायची आहे. जर ही रोकड टॅली झाली तर ही रक्कम पुन्हा राऊत यांना परत केली जाणार असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. तसेच ही रक्कम टॅली झाली नाही तर या संदर्भातदेखील त्यांची चौकशी केली जाऊ शकते.

राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी
ईडीच्या कारवाईविरोधात संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. दरम्यान, शिवसैनिकांना अटकाव करण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही केली. या कारवाईचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. ठिकठिकाणी शिवसैनिकही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कधीही हार मानणार नाही
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ट्वीट करत झुकेंगे नही, असे म्हटले आहे. ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने त्यांच्या दादर येथील घरातून ताब्यात घेतले. यानंतर त्यांनी ट्वीट करून तुम्ही त्या व्यक्तीला घाबरू शकत नाही, जो कधीही हार मानत नाही. झुकेंगे नही, असे त्यांनी म्हटले. शिवसेनेला त्रास देण्यासाठी महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या