ठाणे : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकनंतर आता ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांच्याविरोधात रविवारी (१९ फेब्रुवारी) संध्याकाळी आंदोलन केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्रिपदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल (१९ फेब्रुवारी) पुणे दौ-यावर होते. अमित शहा यांनी आपल्या पुणे दौ-यात ‘मोदी @ २०’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात अमित शहा यांनी यूपीए सरकार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘तळवे’ चाटले, असे वक्तव्य अमित शहु यांनी केले होते.