बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत!
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ््यानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट ना हरकत पत्र देऊन ३ केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांवर लवकरच कारवाई होणार आहे. शिक्षण विभागाने या शाळांच्या नावाची यादी जाहीर केली. याप्रमाणे अजूनही जिल्ह्यात काही शाळा आहेत, जे बनावट प्रमाणपत्राआधारे शाळा चालवत आहेत, अशी तक्रार प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली. हा प्रकार उघडकीस आल्याने बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा रंगली आहे.
बोगस प्रमाणपत्राआधारे तीन शाळा सुरू असल्याचे उघडकीस आले असून, या तिन्ही सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जे शासनाचे प्रमाणपत्र आहे, ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे. १२ लाखांत बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. मंत्रालयातील अधिका-यांकडून ही एनओसी दिली जाते. पण ही टोळी चक्क १२ लाखांत सीबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बोगस प्रमाणपत्राआधारे चालणा-या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक सीबीएससी शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली ते लावावे, जेणेकरून ज्यांची मान्यता आहे, त्यांची मान्यता समोर येईल, अशा सूचना आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना दिल्या आहेत. ज्यांची मान्यता नसेल तेही यामुळे समोर येतील, असे उकिरडे यांनी सांगितले.
बोगस प्रमाणपत्राआधारे
चालणा-या या ३ शाळा
१) एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बीएमसीसी रोड, शिवाजीनगर
२) नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज
३) क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज