नाशिक : मालेगावकडून साक्रीकडे येणा-या स्कूल बसला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शाळेच्या बसमध्ये लग्नाचे व-हाड साक्रीत येत असताना भडगाव बारीजवळ ही बस उलटून अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेसह एका लहान मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथील तरुणीचा विवाह साक्रीतील राजे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मालेगाव तालुक्यातीलच एका शाळेच्या बसमध्ये मुलीकडील व-हाड लग्नासाठी येण्यास निघाले. ही गाडी भडगाव बारीमध्ये आली असता बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
यातील सरिता खैरनार आणि लावण्या चव्हाण या दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती कळाल्याने साक्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे साक्री पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.