लातूर : प्रतिनिधी
शहरातील मोतीनगर भागातील एका आडत व्यापा-यास कोरोनाची लागण झाली आहे़ गुरुवार, दि़ २८ मे रोजी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि पोलिसांसह महानगरपालिकेची अख्खी कुमक मोतीनगरमध्ये पोहोचली़ गुरुवारी रात्रभर संपूर्ण परिसर पिंजून काढून काही भाग सील करण्यात आला आहे़ प्रतिबंधित क्षेत्रात २१३ लोकसंख्या असलेल्या एकूण ५४ कुटुंबांचा समावेश आहे.
सदर आडत व्यापा-याचा कोणत्याही प्रवासाचा इतिहास नाही़ तो कोणाच्या तरी संपर्कात आल्याने कोरोनाबाधित झाला आहे़ शहरात अशा पद्धतीचा पहिलाच प्रकार समोर आल्याने पोलिस प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण मोतीनगर परिसर पिंजून काढला. बाधित रुग्णाचा ठावठिकाणा सापडल्यानंतर तो भाग पूर्णपणे सील करण्यात आला.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गुरुवारी संस्थेतील २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते़ त्यापैकी २२ व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मोतीनगरमधील आडत व्यापारी बुधवार, दि़ २७ मे रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारांसाठी आला होता़ त्याला कोरोना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ़ मारुती कराळे यांनी दिली.
Read More कुटुंबातील २० जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू
शहरात नव्याने एक व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आजवर शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या १० झाली आहे. मोतीनगर, सुवर्ण हनुमान मंदिर परिसर कंटेनमेंट झोन-३ भागास महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार तसेच उपआयुक्त वसुधा फड व पोलिस अधिकाºयांनी भेट देऊन सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित केल्या. या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लातूरकरांनी घाबरून जाऊ नये; परंतु सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ लातूर शहरात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे़ हे पाहता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे़ मास्कचा किंवा साधा रुमाल तोंडाला बांधावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, गर्दी टाळावी, घरातून बाहेर पडणे टाळावे, सॅनिटायझरने हात धुवावेत आदी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे़ लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिलेली असली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विसर पडता कामा नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची स्क्रिनिंग टेस्ट
मोतीनगरमधील सुवर्ण हनुमान मंिदर परिसरातील एका आडत व्यापाºयास कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे़ हा परिसर लातूर शहरातील कंटेनमेंट झोन-३ झाला असून या झोनमधील ५४ कुटुंबांतील २१३ नागरिकांची स्क्रिनिंग टेस्ट महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.