22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटात जाणा-या संभाव्य खासदारांना सुरक्षा ;घर आणि कार्यालयाला सुरक्षा कवच

शिंदे गटात जाणा-या संभाव्य खासदारांना सुरक्षा ;घर आणि कार्यालयाला सुरक्षा कवच

एकमत ऑनलाईन

नाशिक : शिंदे गटात जाणा-या शिवसेनेच्या संभाव्य खासदारांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर नागपूरमधील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणा-या संभाव्य खासदारांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

हेमंत गोडसे यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त
नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हेमंत गोडसे यांचे घर आणि निवासस्थानाबाहेर २४ तास शस्त्रधारी पोलिस तैनात आहेत. यामध्ये नाशिकचे स्थानिक पोलिस, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांचा बंदोबस्त आहे.

नागपुरात कृपाल तुमानेंच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त
नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर बंदोबस्त लावल्याच्या माहितीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.

शिंदे गटात सामील होणारे खासदार
राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमाने, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, धैर्यशिल माने, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक आणि श्रीरंग बारणे.
वरील खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. लोकसभेत ‘आम्हीच शिवसेना’ असा दावा करणार आहेत. यात राहुल शेवाळे गटनेते आणि भावना गवळी यांची प्रतोदपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त!
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धैर्यशील माने असोत किंवा संजय मंडलिक हे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. केवळ अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी इथल्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या