मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीविताला धोका असतानाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा नाकारली असा आरोप शिंदे गटाचे आ. सुहास कांदे यांनी केला होता. शिवाय त्यांनी केलेल्या आरोपाचे सतेज पाटील यांनी खंडन केले तर आता शंभुराज देसाई यांनी मात्र दुजोरा दिला आहे.
त्यादरम्यान नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आले होते. केवळ त्यांनाच नाहीतर त्यांच्या कुटुंबियांनाही धमकी देण्यात आली होती. असे असताना सुरक्षा देणे महत्त्वाचे होते. मात्र, याबाबत ‘वर्षा’वरून विचारणा झाल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशी वागणूक दिली जात होती याचे दाखलेही त्यांच्या गटातील आमदारांनी देण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हणाले देसाई?
नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहांत चर्चाही झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या अनुशंगाने राज्य गृहमंत्री म्हणून सुरक्षाही जाहीर केली होती. धमकी पत्राची सतत्या पडताळण्यात आली. यामध्येही त्यांना सुरक्षेची गरज पाहिजे असाच सूर उमटला होता.
त्याअनुशंगाने अधिका-यांशी बैठक पार पडत असताना सकाळी ८ ते साडेआठच्या दरम्यान आपणास ‘वर्षा’ निवासस्थानावरून फोन आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांना सुरक्षेची गरज नसल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे देसाई म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका उद्देश काय होता हे माहीत नसल्याचेही ते म्हणाले आहेत.