मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबईच्या दौ-यावर होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन आणि धन्यवाद करतानाच, त्यांचा निर्णय हा दबावातच झालेला आहे, असा टोलाही खासदार नवनीत राणा यांनी लगावला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनासुद्धा माझी विनंती आहे की, त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, त्यामुळे आदिवासी समाजात विश्वासाची भावना निर्माण होईल असे नवनीत राणा म्हणाल्या.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
शरद पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना पाहून, त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक जण काम करतात. आदिवासींना आज सगळ्यांची समर्थनाची गरज आहे. पहिल्यांदा आज आदिवासी समाजातून तळागाळातून काम करून एक महिला वर आली आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत किंवा त्यांना मोदीजींनी समर्थन दिले आहे, हा विचार न करता त्या कोणत्या समाजातून येतात आणि किती धडपड करून त्या इथे आल्या आहेत.
त्या समाजाच्या पाठिशी आपण सगळे आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी पवार साहेबांना विनंती करते की, त्यांनी आपल्या सगळ्या आमदार आणि खासदारांचे समर्थन द्यावे.
दरम्यान, राज्य सरकारने पेट्रोलवरील करात पाच रुपये आणि डिझेलवरील करात तीन रुपयांची घट झाली असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून नवीन इंधन दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे. राज्यातील विकास कामांवर याचा परिणाम होणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.