मुंबई : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएने आयोजित केलेल्या बैठकीचे शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत.
शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे.
नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले.
शिवसैनिकांनी विचार करावा
अडीच वर्षात राष्ट्रवादीला टॉनिक मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेत्यांकडून तसे जाहीरपणे सूतोवाचही केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या पालखीचे भोई होणे शिवसैनिकांना पटणार आहे का, याचा विचार शिवसैनिकांनी करावा असे आवाहन केसरकरांनी केला आहे.
हा तर रडीचा डाव
शिवसेनेने राज्यपालांना शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करू नये याबाबत राज्यपालांना पत्र दिले आहे. त्याबाबत दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, रडीचा खेळ राजकारणात असता कामा नये, असे मला वाटते. चुकीच्या नेत्यांकडून पक्षप्रमुखांना माहिती दिली जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हे पाऊल उचलले जात आहे असेही त्यांनी म्हटले.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाही
शिवसेनेमधील मी शेवटचा मनुष्य असलो तरी काँग्रेससोबत जाणार नाही असे बाळासाहेबांनी म्हटले होते. काँग्रेससोबत जाणे म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.