23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeशेलारांना मंत्रिपदाऐवजी प्रदेशाध्यपद?

शेलारांना मंत्रिपदाऐवजी प्रदेशाध्यपद?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सरकार स्थापन होऊन तब्बल सव्वा महिना उलटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करीत आहेत. संबंधित खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्याने जनतेची अनेक कामं खोळंबली आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस यांच्या तोडीचे नेते आशिष शेलार यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात १५ ते १७ जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपकडून ८ नावे चर्चेत आहेत. त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाककृष्ण विखे-पाटील, बबनराव लोणीकर, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण, नितेश राणेंची नावे आघाडीवर आहेत.

आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते. मुंबई भाजपमधील महत्त्वाचा चेहरा अशी शेलार यांची ओळख आहे. मराठा नेता, टास्कमास्टर, सर्वपक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध या शेलारांच्या जमेच्या बाजू आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी शेलार यांना शिक्षण मंत्रिपद देण्यात आले होते. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर आरोप झाल्याने त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्या जागी शेलारांना संधी देण्यात आली. १६ जून २०१९ ते १२ नोव्हेंबर २०१९ दरम्यान शेलारांकडे मंत्रिपद होते.

आशिष शेलार विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. २०१२ ते २०१४ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये ते मुंबईच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढवली. शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने भाजपसमोर आव्हान होते. शेलार यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपने ३१ वरून ८२ वर उडी मारली. शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेल्या यशात शेलारांचा सिहाचा वाटा होता.

मराठा चेहरा म्हणून ओळख
भाजपमधील महत्त्वाचा मराठा चेहरा म्हणून आशिष शेलार ओळखले जातात. फडणवीसांच्या तोडीचे नेते अशी त्यांची राजकीय वर्तुळातील ओळख आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असताना भाजपने एकनाथ शिंदेंच्या रुपात मराठा मुख्यमंत्री दिला. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही शेलारांच्या रुपात मराठा चेहरा दिला जाऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या