22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे-भाजपचं सरकार बनतंय पण खात्यांवर फिस्कटतंय?

शिंदे-भाजपचं सरकार बनतंय पण खात्यांवर फिस्कटतंय?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आमदार येत्या दोन दिवसांत मुंबईत येतील आणि रविवारपर्यंत नवे सरकार आलेले असेल असा दावा भाजपाच्या गोटातून करण्यात येतो आहे. मात्र सरकार स्थापण्यापूर्वी खातेवाटपावरुन पेच सुरु असल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी हे सगळे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे.

मात्र हे बाहेरचे संकट सोडवण्याबरोबरच सत्ता स्थापनेतील खातेवाटपाचा संघर्ष हाही शिंदे आणि भाजपा सरकारला करावा लागणार आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे असावे, अशी मागणी बंडखोर आमदारांकडून होते आहे. यात उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करुन नरेंद्र मोदींशी बोलावे असे आवाहनही दीपक केसरकर यांनी केले आहे. आता खातेवाटपावरुनही एकनाथ शिंदे दोन खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. इंग्रजी वृत्तपत्राच्या एका पत्रकाराने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

अर्थखाते आणि नगरविकास खात्याचा आग्रह
एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार सत्तेत येण्याची प्रक्रिया सुरु असली, तरी काही खात्यांबाबत अद्यापही तिढा आहे, तो सुटलेला नसल्याची माहिती आहे. त्यात अर्थखाते आणि नगर विकास खात्यासाठी एकनाथ शिंदे गट आग्रही असल्याची माहिती आहे. भाजपाला ही खाती एकनाथ शिंदे गटाकडे देण्याची इच्छा नसल्याने ते टाळत असल्याचेही कळते आहे. चांगली खाती भाजपाकडेच राहावीत, असा भाजपाचा आग्रह असल्याची माहिती आहे.

अर्थखात्यासाठी आणि नगर विकाससाठी आग्रही शिंदे
अर्थखाते महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे निधी हा राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळत होता, मात्र शिवसेनेच्या आमदारांना मिळत नव्हता, असा आरोप सातत्याने शिवसेना आमदार करीत होते. त्यामुळेच आमदारांची नाराजी अधिक होती. अर्थ आणि गृह ही दोन्ही खाती सत्तेत शिवसेनेकडे असायला हवी, अशी आमदारांची मागणी होती. आता शिंदे गट सरकारमध्ये येत असताना, स्वाभाविकच त्यांना अर्थ खात्यावर त्यांची पकड हवी आहे.

नगरविकास खातेही शिंदेंकडे राहिले, तर मुंबई शहर आणि इतर मोठ्या शहरांत होणा-या प्रकल्पांचे श्रेय आपसूक शिंदे यांच्याकडे जाईल. आत्तापर्यंत नगरविकास खाते हे मुख्यमंत्र्यांनी स्वताकडेच ठेवल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच या दोन्ही खात्यांसाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे मानण्यात येते आहे.

भाजपा श्रेष्ठींशी चर्चेनंतर अंतिम ड्राफ्ट तयार होण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी रवाना झालेले आहेत. अशा स्थितीत आता एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या खातेवाटपाबाबतच्या मागण्यांबाबत आता दिल्लीतच चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या मागण्या किती मान्य होतात, यावर सत्तास्थापनेचा पुढचा घटनाक्रम ठरण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या