मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारने आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. १६४ मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ंिजकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय.
पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी ११ वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज मोठी परीक्षा होती. मात्र काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सहज जिंकल्यानंतर तशी ही लढाई सोपी झाली होती. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या बहुमताच्या प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली.
दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली होती.