मुंबई : मुंबई पालिकेतील शिवसेनेचे पक्ष कार्यालय कोणाचे?, यावरून आता ठाकरे गट व शिंदे गट आमने-सामने आले आहेत. काल शिंदे गटाने पालिकेतील शिवसेना पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे व शिंदे गटात पालिकेतच जोरदार राडा झाला होता.
त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबई पालिकेतील सर्व पक्षांच्या कार्यालयांनाच सील ठोकण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे आज ठाकरे गट आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याविरोधातच चांगलाच आक्रमक झाला आहे.
ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. पक्षाचे कार्यालय कोणतीही नोटीस न देता बंद करून प्रशासक मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. आंदोलनात सहभागी पालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, आमच्या पक्षाचे कार्यालय सील करण्यापूर्वी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. शिंदे गटाच्या दबावाखाली आयुक्त काम करत असल्याचे दिसत आहे. आयुक्तांची ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही.
आंदोलनात सहभागी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक म्हणाले, शिंदे गटाच्या दबावामुळे पक्ष कार्यालयच बंद केल्याने समस्या घेऊन येणा-या नागरिकांनी आता जायचे कोठे? याचे उत्तर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी द्यावे.
कार्यालय मिळेपर्यंत ठिय्या
तसेच, इक्बालसिंह चहल आमची भेट घेत नाहीत व पुन्हा शिवसेना पक्षाचे कार्यालय सुरू करत नाहीत तोपर्यंत आम्ही चहल यांच्या कार्यालयासमोरून हटणार नाही, असा पवित्राही आंदोलकांनी घेतला आहे.