केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, याचा निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर उद्या निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली, तर याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचे अस्तित्व मान्य केल्यासारखे होते. त्यामुळे एक तर मुदतवाढ किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय या दोन शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष, चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाचवेळी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरू आहे. पण सुप्रीम कोर्टात प्रकरण वारंवार लांबणीवर जात असताना आयोगाची कार्यवाही मात्र पद्धतशीर सुरु आहे. या आधी १० जानेवारीला सुनावणी झाल्यानंतर लगेच पुढची सुनावणी उद्या होत आहे.
या अगोदर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
१० जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण केसच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले. सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा, अशी विनंती केली. पण केसच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ, असे आयोगाने म्हटले आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने वकील महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद पूर्ण केले आहेत.
अंतिम निकालासाठीचा मुहूर्त नेमका कुठला?
२३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. शिवसेनेतल्या या अभूतपूर्व बंडानंतरची ही पहिली जयंती. त्याचवेळी निवडणूक आयोगातली लढाईही शिगेला पोहोचलेली असेल. सुनावणी पूर्ण झाली तर आयोग निकाल राखून ठेवून नंतरही जाहीर करू शकते. त्यामुळे या अंतिम निकालासाठीचा मुहूर्त नेमका कुठला असणार आणि तो सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या सुनावणीआधीचाच असणार का याची चर्चा सुरू आहे.