मुंबई : शिवसेना आमच्या रक्ताने बनलेली पार्टी आहे. कोणाकडे तरी पैसा आहे म्हणून कोणी विकत घेऊ शकत नाही. आमच्यावर कोणतेही संकट नाही. आमच्यासाठी पक्षाच्या विस्ताराची ही संधी आहे. पक्षाचे विचार आणि भविष्यातील संधींवर आम्ही विचारमंथन करणार आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडावर जोरदार टीका केली.
राऊत म्हणाले, ‘आज हजारो शिवसैनिक आमच्या पाठिशी उभे आहेत. पैसा, दहशतवादाच्या जिवावर आम्हाला कोणी विकत घेऊ शकणार नाही. आता माझ्याकडे सांगली आणि मिरजेहून शिवसैनिक आलेत, ही पक्षाची मोठी आणि खरी ताकद आहे. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबुतीने आमच्या पाठिशी ठाम उभे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारं हे सगळं घडतंय.
दहा बंडखोर आमदारांनी आमच्याशी बातचीत केली आहे. आसामच्या हॉटेलमधील १० जणांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. शिवाय, राष्ट्रवादीसोबत आमची बैठकही झाली आहे. त्या ठिकाणचे १० जण माघारी यायला तयार आहेत, त्यामुळे आमचे सरकार स्थिर आहे.
शिवसैनिकांचा अजून विस्फोट झालेला नाही. जर झाला तर वेगळे चित्र असेल. आम्ही संयम राखण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या आहेत. तसेच ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची आमची जबाबदारी नाही. राज्याबाहेर पळालेल्यांची सुरक्षा आम्ही का करावी? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.