मुंबई : ज्यांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कारवाई करणार आहे. शिवसेना कधीही संपणार नाही. बंडखोर आमदार जनतेचा सामना कसा करणार आहेत? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केला आहे. मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. व्हीपसंदर्भात जे काही उल्लंघन झाले त्याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्यांनी बंडखोरी केलीये, जे पळून गेलेत त्यांना शिवसेना संपवायची आहे. मात्र शिवसेना कधी संपणार नाही. हे आमदार जेव्हा जनेतचा सामना करतील तेव्हा काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी इमारत कोसळली तेव्हा तेथील आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे ते म्हणाले की, आमदार अजूनही मतदार संघात गेलेले नाहीत. २० मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का असे विचारण्यात आले होते. ही घटना सत्य आहे. यासंबंधित वर्षावर बैठकही झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जन्म पक्षात जे अस काही करू शकतात, ते कर्म पक्षातही हे नक्कीच होईल असे खात्रीलायक वक्तव्यही त्यांनी केले आहे.त्यामुळे हे बंडखोर आमदार ज्या पक्षात गेलेत त्यांनी सावध रहावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.