मुंबई : शिवसेनेने मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर २४ तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं थेट आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना केलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत पुढं म्हणाले, बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्ला वजा इशाराही त्यांनी आमदारांना दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढलीय. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही शिवसेनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलंय. आमदार आणि पक्ष यात फरक आहे, असं ते म्हणाले. आमदार म्हणजे पक्ष नव्हेत, असं म्हणतानाच राऊतांनी शिंदे यांना टोला लगावला आहे.