मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी अयोध्येत जय्यत तयारी झाली असून आज शरयूच्या तीरावर शिवसेनेचा उत्सव साजरा होणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आदित्य ठाकरे आज अयोध्या दौ-यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत अयोध्येत तयारीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.
अयोध्येत आम्ही गेल्या ३५ वर्षांपासून येत आहोत. त्यामुळे कोणी आम्हाला हनुमान चालिसा पुस्तक घेऊन राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते त्यांच्यापुरते ठेवावे. आमच्या मनात राम आहे, असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला.
शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी चौकशीवर बोलताना ते म्हणाले की, परखडपणे बोलणा-या आणि पक्षवाढीसाठी काम करणा-या नेत्यांना त्रास देण्याचे काम केंद्रीय तपास यंत्रणा करत आहे.
राजकीय सूड आणि बदला घेतला जात आहे. मुंबईत अनिल परब यांना आलेली नोटीस आणि दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या चौकशीवरून हे स्पष्ट होत आहे. राहुल गांधी यांना रात्री बारा वाजेपर्यंत ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवले जात आहे. ही हुकूमशाहीची सुरुवात नाही तर हे हुकूमशाहीचे टोक आहे. हिटलरनेही आपल्या विरोधकांना इतक्या निर्दयीपणे संपवले नसेल.
लोकशाहीचा गळा घोटला
संजय राऊत म्हणाले की, ज्या देशातील लोकशाहीचा डंका जगभरात वाजवला जातो त्याच भारतात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हा देशाच्या स्वातंत्र्याचा पराभव असल्याचेही त्यांनी म्हटले. हा पराभव भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केला आहे. त्यामुळे स्वतंत्र्याची लढाई पुन्हा लढावी लागेल, अशा प्रकारचे चित्र देशात निर्माण झाले आहे.