22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निकाल लांबणीवर; उद्या दुपारी १२ नंतर होणार सुनावणी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निकाल लांबणीवर; उद्या दुपारी १२ नंतर होणार सुनावणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही, याचा निकाल आता लांबणीवर पडला आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणा-या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे. यामुळे यंदा दस-याला शिवाजी पार्कच्या मैदानावर आवाज कुणाचा असणार? आणि यासंदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वकिलाने आपल्या याचिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ मागितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याच्या याचिकेवरील सुनावणी आज दुपारी अडीच वाजेपर्यंत पुढे ढकलली असल्याची प्रथम माहिती समोर आली होती. दरम्यान, आता शिवसेनेच्या या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा परवानगीबाबत उद्या दुपारी १२ नंतर सुनावणी होणार आहे.

शिवसेनेच्या वकिलांच्या विनंतीवरून आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने आम्ही दाखल केलेल्या अर्जावर उत्तर दिले आहे. आम्ही जेव्हा याचिका दाखल केली तोपर्यंत उत्तर दाखल झाले नव्हते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणाखाली आमची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देण्यात यावी. बदल करून आम्ही नव्या मुद्यावरून याचिकेत सुधारणा करत कोर्टापुढे येऊ शकतो, असा शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे.

एकीकडे काल गोरेगावमध्ये झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, अशी घोषणा दिली आहे. तर दुसरीकडे मात्र, मुंबई महापालिकेने दोन्ही गटाची शिवाजी पार्कसंदर्भातील परवानगी नाकारली आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या वतीने हायकोर्टात मध्यस्थ याचिका सादर करण्यात आली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या