मुंबई : शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी बातमी माध्यमांंमधून प्रसिद्ध करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील अजून शिवसेनेत कार्यरत आहेत. ‘सामना’ वृत्तपत्रातील बातमी अनवधानाने प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे आज शिवसेनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात सामील होत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पाटील यांच्यावर ही कारवाई केली गेल्याचे सांगण्यात आले होते. शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी बंडखोर आमदारांना समर्थन दिल्याचे पाहायला मिळाले.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कारवाईचे सत्र सुरू असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ३९ आमदारांची मोट बांधली आणि बंडाचा झेंडा हाती घेतला आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहेत. तसेच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता शिवसेनेने या घटनेचे स्पष्टीकरण दिले असून माफी मागितली आहे.