पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा केलेल्या २५ वर्षीय तरुणाने वडिलांची नोकरी मिळवण्यासाठी केली हत्या
करीमनगर: सरकारी नोकरीत असलेल्या आई किंवा वडिलांचं निधन झाल्यावर त्यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत घेण्यात येते. मात्र, नोकरी मिळविण्याच्या लालसेपोटी एका तरुणाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेलंगणातील एका गावात राहणाऱ्या तरुणाने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी आपल्या वडिलांची कथितपणे हत्या केली. यावेळी त्याला आई आणि भावानेही मदत केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा केलेल्या २५ वर्षीय तरुणाने टॉवेलच्या सहाय्याने वडिलांचं तोंड दाबून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली आहे. तर त्यांची आई फरार झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन मोबाइल फोन आणि गुन्ह्यात वापरलेला टॉवेल जप्त केला आहे.
वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी
पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरुणाचे वडील पेडापल्ली जिल्ह्यातील गोदावरीखानी येथील संगारेनी या सरकारी कोळसा खाणीत पंप ऑपरेटर होते. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी तरुणाने त्यांची हत्या करण्याचा कट रचला. मोठ्या मुलाने रात्री वडिलांची हत्या केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना सांगितले की, त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, काही नागरिकांना संशय आला. यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यासाठी मुलावर दबाव टाकला त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आणि तपास सुरू झाला.
मोठ्या मुलाने हत्या करण्याची योजना आखली
पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले की, मोठ्या मुलाने हत्या करण्याची योजना आखली आणि त्याला आई, भावाने साथ देण्यास होकार दिला. रामगुंदमचे पोलीस आयुक्त व्ही सत्यनारायण यांनी शनिवारी माहिती दिली की, सरकारी संगोरेनी कोळसा खाणीत नोकरी मिळवण्यासाठी तरुणाने वडिलांची हत्या केली. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
Read More राज्यात पॉझिटिव्ह रूग्णाला निगेटिव्ह ठरवणारं रॅकेट-प्रवीण दरेकर