24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रआजारी रुग्णांना रुग्णालयातच मिळणार ‘श्रीमंत दगडूशेठ’चे दर्शन

आजारी रुग्णांना रुग्णालयातच मिळणार ‘श्रीमंत दगडूशेठ’चे दर्शन

एकमत ऑनलाईन

पुणे : वेगवेगळ्या आजारांशी झुंज देत रुग्णालयाच्या खाटेवर उपचार घेत असलेले रुग्ण परमेश्वराकडे आपण लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतात. ऐन गणेशोत्सवात आपण गणरायासमोर जाऊन नतमस्तक व्हावे, ही इच्छा सामान्यांप्रमाणे या रुग्णांची देखील असते. मात्र, आजारपणामुळे त्यांना रुग्णालयातील खाटेवरुन कोठेही जाता येत नाही.

त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन त्यांना रुग्णालयात, ते आहेत, त्या विभागमध्ये, त्यांच्या खाटेवर बसून देण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे ते रुग्ण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहेत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३० व्या वर्षी गणेशोत्सवात हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिऍलिटी स्टार्टअप – डिजिटल आर्ट व्हीआरई यांनी या उपक्रमाकरिता सहकार्य केले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयू मधील रुग्णांना हे दर्शन घडविण्यापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

ससून रुग्णालयातील रुग्णांना बाप्पाचे यामाध्यमातून दर्शन घेताना आनंदाश्रू अनावर झाले.ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं की, मानवसेवेच्या महामंदिराकडे पुढची पायरी या उपक्रमाद्वारे चढण्याचा हा प्रयत्न आहे. पुणे शहरातील १५ रुग्णालयांमधील अंदाजे ५०० रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ट्रस्टचा मानस आहे.

याबाबत संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांच्या विशेष परवानग्या घेतल्या आहेत, ज्यांनी आम्हाला उत्सवाच्या या १०दिवसांमध्ये हा अनुभव देण्यास अनुमती दिली आहे. यामुळे रुग्णांना वेगळी उर्जा व समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरुपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. कोविडमुळे निर्माण झालेले भय व नैराश्य दूर होऊन यामाध्यमातून रुग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या