22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्ररुग्णसंख्येत लक्षणीय घट, लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत बुधवारी निर्णय

रुग्णसंख्येत लक्षणीय घट, लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत बुधवारी निर्णय

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१० (प्रतिनिधी) कठोर निर्बंध व लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६१ हजार ६०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, ३७ हजार ३२६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई, ठाणे, पुण्यासह प्रमुख शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी काही जिल्ह्यातील स्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे १५ मे नंतर लॉकडाऊन कायम ठेवायचे, की काही निर्बंध शिथिल करायचे याचा निर्णय बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊन राज्याची स्थिती चिंताजनक झाली होती. राज्यात रोज ६५ ते ७० हजार नवे रुग्ण आढळत होते. रुग्णालये ओसंडून वाहत होती. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीर व अन्य औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यात १५ एप्रिलपासून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतरही स्थिती नियंत्रणात न आल्याने २२ एप्रिलपासून १ मे पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मुदत नंतर १५ मे पर्यंत वाढवण्यात आली होती. गेल्या काही दिवसात स्थिती थोडी सुधारली असली तरी अजूनही काही जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी स्तरावर लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यस्तरावरील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत सुरू ठेवावा अशी शिफारस आरोग्य विभागाने केली आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विस्तृत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

गेल्या २४ तासात राज्यात ६१ हजार ६०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ३७ हजार ३२६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात दिवसभरात ५४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ सक्रिय रुग्ण असून, ३६ लाख ७० हजार व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये, तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील स्थिती नियंत्रणात
मागच्या महिन्यात मुंबई व आजूबाजूच्या शहरातील स्थिती अत्यंत बिकट झाली होती. एकट्या मुंबई शहरात रोज १२ हजाराच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत होते. मात्र या स्थितीत झपाट्याने सुधारणा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने व नीती आयोगानेही मुंबई महापालिकेची याबद्दल प्रशंसा केली आहे. गेल्या २४ तासात मुंबई शहरात १ हजार ७८२ नवे रुग्ण आढळले आहेत. शेजारील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील स्थितीही सुधारली आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध शिथिल होणार का ? याबद्दल उत्सुकता आहे. मात्र मुंबईतील लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय आजूबाजूच्या शहरातील परिस्थितीवर ठरेल, असे महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतक-याची फसवणुक करणा-या व्यापा-याला अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या