करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पतंजली सरसावले
नवी दिल्ली : सध्या जगभरात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिक लस तयार करण्याचे वेगाने सुरु आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने करोनाच्या उपचारासाठी औषधाची वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची माहिती दिली आहे. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पतंजलीने औषधाची चाचणी सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.
आम्ही केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबद्दल बोलत नाही. आम्ही करोनाच्या उपचाराबद्दल सांगत आहोत. गेल्या आठवड्यात नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर कंपनीने इंदूर आणि जयपूरमध्ये करोनाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. एका इंगजी संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. करोनाच्या चाचण्यांदरम्यान सध्या केवळ मोठ्या कंपन्यांची नावे समोर येत होती. यामध्ये गिलियड सायंसेज, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, इनोव्हियो फार्मा आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या कपंन्या पुढे असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता यात पतंजलीचे देखील नाव जोडले गेले आहे. या यादीत पतंजलीचे नाव जोडले जाणे ही कंपनीसाठी मोठी बाब असल्याचे म्हटले जात आहे.
Read More दहशतवादी कसाबची ओळख पटवणा-या साक्षीदाराचे निधन
फेब्रुवारी महिन्यापासूनच पंतजली समुहाने करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू केले होते. मार्च महिन्यापर्यंत पतंजलीने अनेकांवर उपचार केले. परंतु ते वैद्यकीय चाचणीचा भाग नव्हते. आमच्या संशोधनाला उपचाराच्या रुपात आणण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. याकडेच पाहता नियामक मंडळाची मान्यता घेतल्यानंतर याची वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली, असे बालकृष्ण म्हणाले.
वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळवणे सोप नव्हते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील हे पुढे नेण्यास रस दाखवला नाही. म्हणून पतंजली समुहाने क्लिनिकल ट्रायल्स रेग्युलेटर ऑफ इंडियाकडे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आणि जयपूर विद्यापीठाअंतर्गत एका विभागात वैद्यकीय चाचण्यांना सुरूवात केल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले. कोणत्याही आयुर्वेदीक कंपनी किंवा संस्थेत असलेल्या सुविधांशी आमची तुलना करा. आमच्या प्रयोगशाळा या उत्तम आहेत. आमच्याकडे सध्या ५०० संशोधक आहेत आणि त्यापैकी कमीतकमी १०० हे पोस्ट डॉक्टरेट संशोधक आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. २०१९ मध्ये योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचे टर्नओव्हर ८ हजार ५०० कोटी रूपये इतके होते. तसेच या कंपनीत ५० हजार कर्मचारी काम करत होते. ब्रोकरेज हाऊस सीएलएसए आणि एचएसबीसीनुसार पतंजली ही भारतातील तेजीने वाढणारी एफएमजीसी आहे.