19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रसाहेब, शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही, मला क्षमा करा...; नारायण राणेंचे...

साहेब, शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही, मला क्षमा करा…; नारायण राणेंचे बाळासाहेबांसाठी भावनिक पत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे.

त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही आजारी असताना मला तुम्हाला भेटायचं होते. तुम्हाला शेवटचे पाहायचे होते. पण साहेब, मी तुम्हाला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा, असे भावनिक पत्रच नारायण राणे यांनी लिहिले आहे. राणे यांचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

नारायण राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दोन पानी पत्र पोस्ट केलं आहे. या पत्रात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

शेवटच्या काळात बाळासाहेब आजारी असताना त्यांना भेटण्यासाठी … त्यांना शेवटचे पाहण्यासाठी मनाची कशी घालमेल झाली होती. आपण कसे अस्वस्थ झालो होतो, यांचे वर्णनच राणे यांनी या पत्रातून केले आहे.

गुरुस्मरण
आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचे वृत मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीने माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणा-या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला.

सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधी परिणामच झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असे व्यक्तिमत्व माझ्या गुरुस्थानी आहे हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आले नाही याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे.

साहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपले माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं. आपल्या तीक्ष्ण बुद्धीने आणि परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजाच्या सगळ्या थरांमधून मित्र आणि अनुयायी लाभले होते. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला.

त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरुण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करीत आणि जो विश्वास दाखवीत, त्यामुळे ती माणसे त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत.

ते आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेत आले होते. दु:खाच्या प्रसंगी ते विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते.
मला स्वत:ला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे आहे हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.

माणसाने विचाराने श्रीमंत असावे आणि ही श्रीमंती त्यानं वाटत राहिली पाहिजे हा त्यांचा विचार माझी नेहमी पाठराखण करत राहील. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्य झाला आहे. त्यांनी आपला भक्कम पाठिंबा दिला. म्हणूनच मी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या उण्यापु-या नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत लक्षात राहील असं काम करू शकलो.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या