नीरा : संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम मांडकी येथे घेऊन जेऊर,पिंपरे (खुर्द) मार्गे नीरा शहरात विसावला. अहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली.
आज सोमवारी सकाळी पुरंदर तालुक्यातील बागायती गाव म्हणून ओळख असलेल्या मांडकी गावचा मुक्काम आटपून, जेऊर मार्गे पिंपरे (खुर्द) येथे सकाळच्या न्याहरीसाठी विसावला. जेऊर येथे ग्रामपंचायतीचे सरपंच स्वाती शिरसट, उपसरपंच माऊली धुमाळ, सोमेश्वरचे संचालक अनंता तांबे, पोलीस पाटील कुंडलिक तांबे, शामराव धुमाळ यांनी सकाळी सातच्या सुमारास पालखीचे स्वागत केले.
पिंपरे खुर्दचे सरपंच उत्तम थोपटे, पोलीस पाटील सोसायटीचे चेअरमन विलास थोपटे, यांसह ग्रामस्थांनी सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शिवाजी चौकात पालखी रथाचे आगमन साडेअकराच्या सुमारास झाले.
यावेळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण अल्हाददायक झाले होते. सोहळ्याच्या स्वागतासाठी गावातील पदाधिकारी व भाविक ग्रामस्थ उपस्थित होते.
आहिल्यादेवी होळकर चौकात रथातून पालखी उत्साही भाविकांनी खांद्यावर घेऊन विठ्ठल मंदिरात ठेवली. दुपारच्या या विसाव्याच्या काळात परिसरातील नागरिकांनी रांगालावुन पालखीतील सोपानकांच्या पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. दरवर्षी सोपानकाकांच्या या पालखी सोहळ्यात दिंड्यांचे प्रमाण वाढते आहे. या वर्षी सोहळ्यात ६ दिंड्याची वाढ झाली असून आता १०२ दिंड्या सहभागी झालेल्या आहेत.
संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा विसावल्यानंतर सोहळ्यातील भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल मंदिर सभागृहात अन्नदान करण्यात आले. दुपारी अडिच वाजता पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यातील निंबुत येथील मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे.