भोपाळ : स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीला प्राण गमावावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. स्मार्टफोनमध्ये स्फोट झाल्याने एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील बडनगरची ही घटना आहे. जिथे स्मार्टफोनचा बॉम्बसारखा स्फोट झाला.
तुमच्यासोबत किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत अशी घटना घडू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही स्मार्टफोनच्या वापराबाबत काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. काही चुकांमुळे स्मार्टफोनमध्ये स्फोट होत असल्याचे सांगितले जाते. स्मार्टफोनमध्ये स्फोट होण्याचे कारण म्हणजे उत्पादनातील दोष असतो. या कारणासाठी कंपनी पूर्णपणे जबाबदार असते. स्मार्टफोन चार्जिंगसाठी लोकल चार्जरचा वापर केल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे चार्जिंगच्या वेळी तांत्रिक समस्या निर्माण होऊन स्मार्टफोनचा स्फोट होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्मार्टफोन कोणत्याही चार्जरने चार्ज करू नये. त्यासाठी कंपनीने दिलेल्या चार्जरचा वापर करावा.
स्मार्टफोन हिटींग नियंत्रित करा
वास्तविक फोनमध्ये स्फोट होण्यामागे पॉवर सप्लाय आणि आणि हिटिंग हे दोन कारणे आहेत. तुमचा स्मार्टफोन उन्हात ठेवून चार्ज करू नका. वास्तविक पाहता स्मार्टफोन चार्ज करताना फोन गरम होतो. तसेच सूर्यप्रकाशामुळे फोन बाहेरून गरम होतो. अशामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते.
फोन पूर्ण डिस्चार्ज करू नका
स्मार्टफोन नेहमी पूर्णपणे डिस्चार्ज नसावा. जेव्हा शून्य टक्के डिस्चार्ज झाल्यानंतर फोन आपण चार्जिंगला लावतो. तेव्हा तो गरम अधिक उष्ण होतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी ३० टक्क्यांपर्यंत कमी झाल्यास फोन चार्जिंगला लावावा. त्याशिवाय, ८० ते ९५ टक्के चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबवावे. फोन चार्जिंगला असताना मोबाईलवर बोलणे, त्याचा वापर करणे टाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.