भारताची मालिकेत विजयी आघाडी
दांबुला : श्रीलंकन महिला क्रिकेट संघाने दुस-या टी-२० सामन्यात ठेवलेले १२६ धावांचे आव्हान भारताने १९.१ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भारताने दुसरा टी-२० सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ तर हरमनप्रीत कौरने नाबाद ३१ धावा केल्या.
श्रीलंकेचे १२६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला ३० धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर शेफाली वर्मा १० चेंडूत १७ धावा करून बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि सभिनेनी मेघना यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला मात्र सुगंदिका कुमारीने मेघनाला १७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर स्मृतीने हरमनप्रीत कौरबरोबर भागीदारी रचत संघाला ८६ धावांपर्यंत पोहोचवले.
मात्र स्मृती मानधना आपल्या अर्धशतकाजवळ पोहचत असताना रनवीराने तिला ३९ धावांवर बाद केले. यानंतर कर्णधार कौरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला विजयापर्यंत पोहचवले. तिने ३० चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. तिला यस्तिका भाटियाने १३ धावांची तर दिप्ती शर्माने ५ आणि जेमिमाह रॉड्रिग्जने ३ धावांची साथ दिली. श्रीलंकेकडून रणसिंगे आणि रनवीरा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुस-या टी २० सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने भारतासमोर १२६ धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेकडून सलामीवीर विशमी गुणरत्ने आणि चामरी आटापटू यांना ८७ धावांची सलामी दिली. या दोघींनी भारतीय गोलंदाजांना १४ व्या षटकापर्यंत एकही यश मिळू दिले नाही. गुणरत्नेने ५० चेंडूत ४५ धावांची तर आटापटूने ४१ चेंडूत ४३ धावांची खेळी केली.
मात्र पूजा वस्त्राकरने आटापटूला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर हरमनप्रीत कौरने गुणरत्नेला ४५ धावांवर बाद करत दोन्ही सेट झालेले फलंदाज माघारी धाडले. यानंतर भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मिळवण्यास सुरूवात केली. १७ षटकात २ बाद १०६ धावा करणा-या श्रीलंकेची अवस्था भारताने २० षटकात ७ बाद १२५ अशी केली. आटापटू आणि गुणरत्ने बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर रेणुका सिंह, राधा यादव, पूजा वस्त्राकर आणि हरमनप्रीत कौरने प्रत्येकी १ विकेट घेतली.