लंडन : वृत्तसंस्था
कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे. पण यातूनही मल्ल्या एक मार्ग काढू शकतो, असे वृत्त आहे. ब्रिटनमध्ये आश्रयासाठी अर्ज करण्याचा मार्ग अजूनही मल्ल्याकडे असल्याचे जाणकार सांगतात. इंग्लंडच्या कायद्यात भारतीय व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाºया बॅरिस्टर करिश्मा वोरा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. मल्ल्याने कदाचित यासाठी अगोदरच अर्ज केला असेल, असेही त्या म्हणाल्या.
मल्ल्याला चांगला सल्ला कुणी दिला असेल तर त्याने आतापर्यंत आश्रयासाठी अर्जही केला असेल. जर अर्ज केला असेल तर अखेरच्या क्षणापर्यंत ते समोर येणार नाही. मल्ल्याचा आश्रयाचा अर्ज प्रलंबित असेल किंवा तो मंजूर झाला तर त्याचे प्रत्यार्पण होणार नाही, असेही करिश्मा वोरा यांनी सांगितले.
Read More कोणत्याही अटीशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा – विजय मल्ल्या
वोरा यांच्या मते, सुरुवातीला आश्रयासाठी कागदोपत्री अर्ज केला जातो आणि तो नाकारल्यास त्यातही अनेक मार्ग आहेत, जी प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत राहते. ही एक दिवानी कार्यवाही आहे आणि प्रत्यार्पणाच्या खटल्याप्रमाणेच अनेक दिवस चालू शकते, जो एक फौजदारी खटला आहे. आश्रय हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मार्ग आहे आणि जर आश्रय मिळाला तर तुमचे संरक्षण होते. मल्ल्याला आश्रय मिळाला तरीही सीबीआयला माहित होणार नाही, असे वोरा म्हणाल्या.
भारताला आश्रय अर्जाची माहिती मिळणार नाही
ब्रिटनच्या प्रत्यार्पण कायदा २००३ मधील कलम ३९(३) नुसार, जर एखाद्या व्यक्तीने आश्रयासाठी अर्ज केला असेल तर या अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत त्याचे प्रत्यार्पण केले जाणार नाही, अशी तरतूद आहे. त्यामुळे मल्ल्याने हा अर्ज केला आहे का याबाबत माहिती काढणे हे आता आव्हान बनले आहे.