सोलापूर : वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे.
दरम्यान सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. मात्र आता वादग्रस्त व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोलापूर भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक तरुणी कॅमेरासमोर रडताना दिसतेय. त्यानंतर ती हॉटेलच्या रुममधील बेडकडे कॅमेरा नेते, तेव्हा तिथे एक व्यक्त बनियानवर बसलेला पाहायला मिळतो. तेव्हा तरुणी सांगते की, ‘ हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा श्रीकांत देशमुख आहे.
हा बायकोबरोबर संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा’. तेवढ्यात तो तरुण बेडवरुन उठतो आणि त्या तरुणीकडे धाव घेत मोबाईल कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न करतो.
व्हिडीओ बंद करण्यासाठी जेव्हा ती व्यक्ती तरुणीकडे धाव घेतो. त्यावेळी ती महिला म्हणते की, ‘नाही, आता तू बघच. तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलला?’, असा प्रश्न ती तरुणी विचारते. साधारण ३० सेकंदाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.