Thursday, September 28, 2023

सोनिया गांधींनी विरोधी पक्षांची २२ मे रोजी बोलावली बैठक

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या दिल्लीत बैठक होत आहे. देशात करोना व्हायरस लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. ३१ मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवला आहे. केंद्र सरकारने राज्यांना ग्रीन, रेड, आणि ऑरेंज झोन ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मंत्रिमंडळाची बैठक होत असताना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.

विरोधी पक्षांची २२ मे रोजी बैठक
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येत्या शुक्रवारी २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. करोना व्हायरसचे संकट आणि स्थलांतरीत मजुरांचे होणारे हाल या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read More  खबरदार.. नियमांचे उल्लंघन कराल तर..

लॉकडाऊनमुळे देशात स्थलांतरी मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना गावी जाता येत नाहीए. अनेक मजूर चालत गावाकडे निघाले आहेत तर काही जण ट्रकमधून गावाकडे जात आहेत. काही ठिकाणी अपघात होऊन स्थलांतरीत मजुरांचा मृत्यूही होत आहे. ही चिंताजनक परिस्थिती आहे. यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलीन, माकप नेते सीताराम येच्युरी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह एकूण २० पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आपण बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सोमवारीच स्पष्ट केलं आहे, असं वृत्त एएनआयने दिलं आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या