– भाजपचे ठरले! ; टिळक, जगताप कुटुंबातच उमेदवारी?
पिंपरी-चिंचवड : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या पाठोपाठ आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. दोघांची नावे ही उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप पैकी एकाला भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोघांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपा पक्षश्रेष्ठी कोणाला एबी फॉर्म देणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
तसेच, २०१९ मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील अर्ज घेतला आहे. पक्षविरहित अर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणेच पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले असून अजित पवारांनी मुलाखती घेण्याआधीच नाना काटेंनी नामनिर्देशनपत्र विकत घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील बंधू शंकर जगताप आणि दिवंगत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. जगताप कुटुंबासोबत त्यांनी बंद दाराआड चर्चा देखील केली होती. परंतु, ती चर्चा राजकीय नव्हती, देवेंद्र फडणवीस यांनी कौटुंबिक भेट घेतल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले होते. भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. भाजपा पक्षश्रेष्ठी याकडे कसे पाहतात आणि कोणाला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अद्याप महाविकास आघाडीचे चित्र अस्पष्ट आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर टिळक कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी केली होती. त्यांच्यासोबतच मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांचे देखील नाव चर्चेत होते. दोघांकडून पोटनिवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली होती. त्यात आता शैलेश टिळकांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपकडून किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून अजूनही उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही. मात्र टिळकांनी नामनिर्देशन पत्र विकत घेतल्याने भाजपचा उमेदवार ठरल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
नाना काटेंनी विकत घेतले नामनिर्देशन पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्याआधीच नाना काटे यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अद्याप चिंचवड विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला होता. शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता. चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात नाना काटे यांचेदेखील नाव होते. मात्र राष्ट्रवादीची पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच नाना काटे यांनी अर्ज विकत घेतला आहे.
शिंदे गट भाजपला साथ देणार
कसबा पेठ पोटनिवडणूक शिंदे गट लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, मंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली होती. कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार असल्याचे दीपक केसरकरांनी स्पष्ट केले आहे. शिंदे गट आणि भाजप युती कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.