मुंबई (वृत्तसंस्था) : पहिल्या टी २० सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. वानखेडे येथे सुरु असलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहला मुकावं लागले आहे. दरम्यान प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने सलामीवीर इशान किशनने पहिल्या षटकात धमाका केला. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारत रजिताला १७ धावा चोपल्या. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने देखील चौकार मारत दमदार सुरूवात केली.
मात्र त्यानंतर श्रीलंकेने भारताला एका मागून एक धक्के देण्यास सुरूवात केली. तीक्षाणाने गिलला ७ धावांवर बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव देखील ७ धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनला देखील मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलता आला नाही. तो ५ धावा करून माघारी फिरला.
भारताची टॉप ऑर्डर माघारी गेल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी डाव सावरत भारताला ११ षटकात ७७ धावांपर्यंत पोहचवले. मात्र हसरंगाने सेट झालेल्या इशानला ३७ धावांवर बाद करत भारताला चौथा आणि मोठा धक्का दिला. आता सर्व मदार कर्णधार पांड्यावर असताना तो देखील २७ चेंडूत २९ धावा करून संघाने शंभरी पार करण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये पोहचला.
मात्र त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी दमदार भागीदारी रचत ३५ चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचली. यात दीपक हुड्डाच्या २३ चेंडूत केलेल्या नाबाद ४१ धावांचा मोठा वाटा होता. हुड्डाने ४ षटकार आणि १ चौकार मारला. त्याला अक्षर पटेलने २० चेंडूत ३१ धावा करत चांगली साथ दिली. दोघांनी लंकेसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले.