25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाश्रीलंकेने जिंकला आशिया चषक

श्रीलंकेने जिंकला आशिया चषक

एकमत ऑनलाईन

पाकला चारली धूळ, ८ वर्षांनंतर पटकावले जेतेपद
दुबई : श्रीलंकेने तब्बल ८ वर्षांनी आशिया चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी त्यांनी २०१४ साली आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. श्रीलंकेने भानुका राजपक्षाच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर १७१ धावांचे आव्हान पाकिस्तानला दिले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानच्या धावसंख्येला खीळ बसवता आली आणि २३ धावांनी शानदार विजय मिळवित आशिया कपवर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी पाकिस्तानचा बाबर आझम हा श्रीलंकेच्या विजयाच्या मार्गात अडसर बनू पाहत होता. त्याने ५५ धावांची खेळीही साकारली. पण श्रीलंकेच्या डीसिल्व्हाने त्याला बाद केले आणि त्यांना मोठे यश मिळाले. श्रीलंकेसाठी हा एक मोठा विजय ठरला. श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज भानुका राजपक्षाने यावेळी झुंजार अर्धशतक झळकावले आणि संघाला धावांचा डोंगर उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने तर यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि त्याच्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. रौफला पाकिस्तानच्या अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. पण भानुकाने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत श्रीलंकेचा एकाकी किल्ला लढवला आणि नाबाद ७१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी पाकिस्तानपुढे १७१ धावांचे आव्हान ठेवता आले.

फायनलच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. नसीम शाहच्या पहिल्या षटकातील तिस-या चेंडूवरच कुशल मेंडिस बोल्ड झाला आणि श्रीलंकेला पहिला धक्का बसला. श्रीलंकेसाठी हा मोठा धक्का होता. कारण कुशल हा चांगल्या फॉर्मात होता. पण या सामन्यात तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम खानने पहिला विकेट मिळवला. त्यानंतर चौथ्या षटकात पुन्हा एकदा श्रीलंकेला धक्का बसला. श्रीलंकेसाठी हा दुसरा धक्का होता आणि त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर फक्त २३ धावांत गमावले होते.

श्रीलंकेचे एकामागून एक विकेट पडत होते. पण त्याचवेळी श्रीलंकेचा भानुका राजपक्षे हा खेळपट्टीवर ठाम मांडून उभा होता. विकेट पडत असले तरी त्याला काही फरक पडत नव्हता. कारण तो फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत होता. भानुकाने पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि आपले अर्धशतक साकारले. भानुकाच्या अर्धशतकाच्या जोरावरच श्रीलंकेला यावेळी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत पाकिस्तानला रोखले आणि २० षटकांत सर्व गडी बाद करून श्रीलंकेने २३ धावांनी विजय मिळविला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या