अभिजित बिचुकलेंना फक्त ४७ मते ; आनंद दवेंना २९७ मते
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत राज्यभर चर्चेत राहिलेले स्टार उमेदवार अभिजित बिचुकले आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांची दांडी मतदारांनी गुल केल्याची पाहायला मिळाली. निकाल हाती आला तेव्हा बिचुकलेंना फक्त ४७, तर दवेंना २९६ मते पडल्याचे समोर आले आहे.
एका बाजूला रवींद्र धंगेकरांना पहिल्या फेरीत ३ हजार मतांची आघाडी मिळत असताना अभिजित बिचुकले यांना पहिल्या फेरीत अवघी ४ मते मिळाली. तर आपल्याला कसब्यातील ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल, असा दावा करणा-या आनंद दवे यांना पहिल्या फेरीत फक्त १२ मते मिळाली . विशेष म्हणजे या फेरीत या दोघांपेक्षा ‘नोटा’ या पर्यायाला अधिक मते मिळाली आहेत.
राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून एकच रंगत आणली होती. मी या मतदारसंघात राहणारा असल्याचे सांगत जनता या राजकारण्यांना वैतागली असल्याची टीका केली होती व माझाच विजय होईल, असा दावा त्याने केला होता. त्यामुळे नेटक-यांनी बिचुकले यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
दावा मोठा, मते मोजकीच
अभिजित बिचुकले आणि आनंद दवे यांना पहिल्या तीन फे-यांपर्यंत बोटावर मोजण्याइतकीच मते मिळाली. त्यामुळे बिचुकले आणि दवे यांना किती मते मिळाली यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यामध्ये बिचुकले यांना पहिल्या फेरीत अवघी चार मते मिळाल्याने ते चर्चेचा विषय ठरले. तर आनंद दवे यांना १२ मते मिळाली.
विशेष म्हणजे पहिल्या फेरीत ‘नोटा’ला ८६ मते मिळाली.
बिचुकलेंचा दावा काय होता?
मोठ्या मताधिक्क्याने माझा विजय होईल, असा विश्वास काही दिवसांपूर्वी अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला होता. शिवाय मी लवकरच माझा नवा पक्ष काढणार असून माझ्या पक्षाची पहिली महिला मुख्यमंत्री माझी पत्नी होणार असा विश्वास अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला होता.
‘भकास झालेल्या कसब्याचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवतोय’ असे म्हणत कसबा पोटनिवडणुकीचा अर्ज बिचुकले यांनी भरून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.