मुंबई : अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहे. कोकणात २७ मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यामुळे राज्यात वेळेवर सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. त्यानंतर अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून ७ जूनपर्यंत पोहोचणार आहे. विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल.