बक्सर : बिहारमधील बक्सर येथे केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांना जनतेच्या संतापाचा सामना करावा लागला. यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच चौबे यांच्या विरोधात लोकांनी घोषणाबाजी केली. त्यांनी अश्विनी चौबे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. बक्सर-चौसा येथील बनारपूर येथे आलेल्या चौबे यांना सुरक्षा रक्षकांनी जमावापासून सुरक्षितरित्या बाहेर काढले.
केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे हे थर्मल प्लँटमध्ये जाळपोळीनंतर शेतक-यांशी चर्चा करण्यासाठी बनारपूर गावात आले होते. त्यादरम्यान त्यांनी काही वेळा शेतक-यांशी चर्चा केली. मात्र, येथे आलेला जमाव खूप संतप्त झाला. त्यानंतर त्यांनी चौबे यांच्या ताफ्यावर दगडफेक करीत घोषणाबाजी केली. बिहारमधील बक्सर येथे शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आंदोलन करीत आहेत. बक्सर येथील चौसा गावात सतलुज जलविद्युत निगमच्या थर्मल पॉवर प्लँटसाठी जमिनीचे अधिग्रहण झालेले आहे. शेतकरी यासाठी योग्य मोबदला मागत आहेत. पोलिसांनी यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा शेतक-यांच्या घरात घुसून आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी वाहनांची जाळपोळही केली. चौसा पॉवर प्लँटमध्येही मोडतोड करण्यात आली.