23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeगोंधळात गोंधळ आता तरी थांबवा!

गोंधळात गोंधळ आता तरी थांबवा!

एकमत ऑनलाईन

कोरोनाचे संकट देशावर कोसळून आता तब्बल तीन महिने झाले आहेत आणि या संकटाला थोपविण्यासाठी, कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीलाही तब्बल ६५ दिवस उलटून गेले आहेत़ एवढा मोठा कालावधी संपल्यावर आणि देशाने, जनतेने टाळेबंदीची प्रचंड मोठी किंमत मोजल्यावर तरी कोरोनाविरुद्धच्या लढ्याची नेमकी दिशा निश्चित होणे अपेक्षित आहे.

कोरोनाचे अवचित कोसळलेले संकट, त्याबाबत असणारी शास्त्रीय, वैज्ञानिक माहितीची कमतरता, असे संकट हताळण्याचा सरकार, प्रशासनाला अनुभवच नसणे, देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व यंत्रणेची सरकारी अनास्थेने झालेली दुर्दशा, संकटाच्या सकल आकलनात सरकार, प्रशासन कमी पडणे आदी अनेक बाबींमुळे कोरोना संकटाने देशात एकाचवेळी आरोग्य, अर्थ व सामाजिक हलकल्लोळ उडवून दिला आणि गोंधळाची स्थिती निर्माण केली.

हे साहजिकच! जगातल्या सर्वच देशांमध्ये कोरोनाचे संकट धडकले तेव्हा असाच गोंधळ उडाला़ त्याला आपला देश ‘सन्मान्य अपवाद’ ठरावा, ही अपेक्षा म्हणजे दिवसाढवळ्या डोळे उघडे ठेवून पाहिले जाणारे स्वप्नच किंवा मग कल्पनारंजनाची वेडी हौसच! असो!! त्यामुळे सुरुवातीच्या गोंधळासाठी ना केंद्राला, ना राज्य सरकारांना, ना प्रशासनाला दोष देणे किंवा जबाबदार ठरवणे चुकीचे व अन्यायकारकच! मात्र, आता तब्बल तीन महिन्यांचा काळ उलटल्यावर व कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा बरा-वाईट अनुभव घेऊन झाल्यावरही जर अद्याप आपण अंधारातच चाचपडत असू व दिशाभ्रम झाल्याप्रमाणेच भटकत असू तर त्याला काय म्हणावे?

Read More  अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी 4 जूनला होणार सुनावणी

ठाणबंदीचा चौथा टप्पा आता संपत आलेला असतानाही आपल्याला या परिस्थितीत नेमके करायचे काय? लढायचे कसे? हेच ठरत नाही आणि ज्यांनी हे ठरवण्यात पुढाकार घ्यायला हवा ते असा काही विचार करण्यापेक्षा कोरोनाचे संकट आपल्यासाठी राजकीय संकट ठरेल, या धास्तीने ‘डिफेन्स मोड’ मध्ये गेले आहेत़ या ‘डिफेन्स मोड’चे एक सूत्र ठरलेले आहे ते म्हणजे स्वत: कुठलीच जबाबदारी उचलायची नाही, ती इतरांनी उचलावी हीच अपेक्षा बाळगायची़ मात्र, त्यासाठी आपल्या अधिकारांना फाटा द्यायचा नाही़ एका वाक्यात सांगायचे तर ‘अधिकार माझे, जबाबदारी मात्र तुमची’, हेच सूत्र! देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे अधिकार एकहाती घेतले़ त्यावर भलेही राजकीय विरोधक खळखळ करत असले तरी सर्वसामान्य जनतेचा त्यावर अजिबात आक्षेप नाही.

त्यामुळेच मोदींच्या जनता कर्फ्यूपासून, टाळेबंदीच्या व थाळ्या-टाळ्या वाजवण्यापासून दीप पाजळण्याच्या अन् पुष्पवृष्टी करण्याच्या प्रत्येक आवाहनाला व निर्णयाला सर्वसामान्य जनतेने भरभरून प्रतिसाद दिला़ ठाणबंदीने जनतेला सर्वांगाने होरपळून काढले तरी ते सहन केले़ मोदींच्या बरोबरीने राज्य सरकारांनी जे निणर््ाय घेतले ते निमूटपणे मान्य केले, त्याला प्रतिसाद दिला, त्या निर्णयांचा त्रासही सहन केला कारण लक्ष्य होते ते एकत्रितपणे देशातून कोरोनाला घालवण्याचे व पराभूत करण्याचे! मात्र, जसजशी ही लढाई लांबत गेली व आता तर ती दीर्घकालीन असल्याचेच सुस्पष्ट झाले आहे, तसतसे लढ्याचे नेतृत्व करणा-या सेनापतींचेच अवसान संपत चालल्याची चिन्हे दिसतायत व त्यातून हे सेनापती मग ‘डिफेन्स मोड’मध्ये जाऊन एकमेकांकडे बोट दाखविण्याचा ‘ब्लेम गेम’ रंगवतायत!

Read More  केवळ ‘ताप’ मोजणं ही मोठी ‘चूक’, उद्धव ठाकरेंनी सांगितलं ‘कोरोना’ प्रसाराचं कारण

जनतेसाठी ही दुर्दैवाचीच बाब आहे आणि सेनानींच्या या अवसानघाताने जनतेची स्थिती मात्र ‘कशात काय अन् फाटक्यात पाय’ अशीच झाली आहे़ जनतेच्या या स्थितीची जबाबदारी स्वीकारण्यास व त्यावर उपाय काढण्यास कोणताही सेनानी उत्सुक नाहीच! उलट जबाबदारी त्यांची मात्र, अधिकार माझे म्हणत ते वापरण्याची हौस पुरेपूर भागवून घेतो आहे़ त्याने झालंय काय, तर देशात सध्या फक्त गोंधळात गोंधळ हीच स्थिती आहे आणि त्याने अगोदरच होरपळून निघालेल्या जनतेची होरपळ आणखी वाढली आहे़ मग देशवासीयांच्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळाच्या ठाणबंदीच्या हालअपेष्टांनंतर आता काय स्थिती आहे तर केंद्राने विमाने सुरू करण्याचा निर्णय घेतला पण प्रत्येक राज्याचे आपले स्वतंत्र नियम, त्यामुळे उड्डाणे ऐनवेळी रद्द आणि पैसे खर्चून हातात तिकिट घेऊन उभ्या असलेल्या जनतेच्या पदरात काय तर घोर निराशा, संभ्रम व कुचंबणा!

रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय होतो, लोक घराकडे जाण्यासाठी उन्हातान्हात प्रचंड हालअपेष्टा सहन करत रेल्वेस्थानकावर गर्दी करतात, तासन्तास प्रतीक्षा करतात पण स्थानकात रेल्वेगाड्याच नाहीत़ त्यावरून रंगलेले राजकीय वाद मात्र जनतेला ऐकावे लागतात़ त्यातही विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय होतो पण वेळापत्रकाप्रमाणेच्या नियोजित गाड्या ३० जूनपर्यंत बंदच! का? उत्तर नाही़ राज्यात रेल्वेगाड्या सुरू करा अशी मागणी आपणच केंद्राकडे करायची मात्र, त्याचवेळी राज्यातील जिल्हाबंदी कायमच राहणार असे जाहीर करायचे! मग राज्यातलेच जे नागरिक दुस-या जिल्ह्यात, शहरात अडकलेले आहेत त्यांना या रेल्वेगाड्या सुरू होण्याचा काय उपयोग? त्यांना तर अव्वाच्या सव्वा पैसे मोजून खाजगी वाहनानेच घरी जाण्याचा पर्याय!

Read More  फेब्रुवारी महिन्यापासूनच पंतजलीने करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू केले…

ज्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, ज्यांची ती आर्थिक क्षमताच नाही त्यांचे काय? उत्तर नाहीच! मग घरवापसीच्या निर्णयाचा अर्थ काय? माहिती नाही! अशा लोकांसाठी अगोदर एकाने मोफत बससेवेची घोषणा करायची, ती दुसºयाने अवघ्या २४ तासांत रद्दबातल ठरवायची तर तिसºयाने जिल्हाबंदी कायमच असल्याचे जाहीर करायचे! मग या बसेस एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात धावणार कशा? माहिती नाही, उत्तर नाही! त्याचा निर्णय प्रशासन घेणाऱ मात्र, जिल्ह्याचे मालक असणाºयांमध्येही एकवाक्यता नाहीच़ प्रत्येकाचे आपले स्वतंत्र धोरण! परिणाम काय? गोंधळात गोंधळ! त्याची जबाबदारी कुणाची माहिती नाही! हा गोंधळ कोण निस्तरणार? उत्तर नाही! जनतेने काय करायचे? तर संभ्रमित अवस्थेत सैरभैर फिरायचे, हाल सोसायचे व हा गोंधळ कधी संपणार याची प्रतीक्षा करीत रहायचे! त्याही पुढे जाऊन ही प्रतीक्षा किती काळ करायची? उत्तर नाही़ टाळेबंदी वाढणार की, संपणार?

उत्तर नाहीच! वर एवढा सगळा गोंधळात गोंधळ सहन करूनही कोरोनाची लढाई जिंकणार का? त्याचीही शाश्वती नाही की, उत्तर नाही़ कारण ठाणबंदीने निर्माण केलेल्या समस्यांनी उग्र रूप धारण केल्यावर घाईघाईत त्यावर उपाय काढताना घेतलेल्या निर्णयाने कोरोनाविरुद्धच्या लढाईचा मूलमंत्र असलेल्या ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पुरते बारा वाजलेले आहेत़ उलट आजवर ज्या ग्रामीण भागाने स्वयंशिस्त पाळून कोरोनापासून स्वत:चा बचाव केला होता तो ग्रामीण भागही आता या गोंधळात गोंधळाने कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे़ या भागातील कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत चाललीय! मग त्याचा वेगवान प्रसार कसा थांबणार? उत्तर नाहीच! अशा या सगळ्या गोंधळाच्या स्थितीत या लढ्याचे नेतृत्व करणारे सेनानी काय करतायत? तर ‘ब्लेम गेम’ रंगवतायत! हा गोंधळात गोंधळ आता तरी थांबवा, हीच सर्वसामान्य जनतेची आर्त मागणी़ मात्र, त्याकडे लक्ष द्यायला ना सरकारला वेळ आहे, ना ‘बंद’ हेच इतिकर्तव्य मानणाºया नोकरशाहीला!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या