नवी दिल्ली : देशातल्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या प्रकरणांच्या संदर्भात १०० हून अधिक माजी प्रशासकीय अधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी मोदी यांच्याकडे द्वेषाचे राजकारण बंद करण्याची विनंती केली आहे.
माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग, माजी गृहसचिव जी.के. पिल्लई, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रधान सचिव टीकेए नायर यांच्यासह १०८ जणांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या या पत्रात देशातल्या राजकीय स्थितीबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आली असून त्यांनी पंतप्रधानांना देशातले द्वेषाचे राजकारण बंद करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की तुमच्याच सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे तुमचे वचन लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला हे आवाहन करत आहोत.
या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की तुम्ही पक्षाभिमानाच्याही पुढे जाऊन विचार करत तुमच्या पक्षाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सरकारमध्ये चाललेले द्वेषाचे राजकारण बंद कराल.
या पत्रात पुढे लिहिले आहे की, सध्या ज्या निर्दयीपणे देशाच्या संस्थापकांनी घालून दिलेले संविधानिक नियम, आदर्श सहजपणे नष्ट केले जात आहेत, ते पाहून आम्हाला आमचा राग आणि अस्वस्थता व्यक्त करावीशी वाटली. देशात गेल्या काही वर्षांपासून, महिन्यांपासून भाजपाशासित आसाम, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अल्पसंख्याक समुदायाविरोधात विशेषत: मुस्लीमांच्या विरोधात जो सांप्रदायिक हिंसाचार सुरू आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पत्रातून भाजपाशासित राज्यांमध्ये मुस्लिमांच्या बाबतीत सांप्रदायिक हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. या भाजपाशासित राज्यांमध्ये कायदा हा शांतता राखण्याचे माध्यम नसून अल्पसंख्यांकांना कायम धाकात, भयात ठेवण्याचे माध्यम झाले आहे. आपला देश हा आता स्वत:च नागरिकांचे विभाजन करत आहे. द्वेषातून दलित, गरीब आणि उपेक्षितांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात आहेत, आत्तापर्यंत कधी नाही अशी भीती पसरविली जात आहे.